latest Post

विम्याचा महिमा - Online Insurance and Loans

Financial Management has always been the crux of success at home, office or any organization. Use of various apps, websites and services enabled through use of information technology has made the basics of this arena easy and interesting. Let us take a peep at some. The following article had appeared in 22nd April 2011 issue of Dainik Pratyaksha. (Some of the features may have been added or deleted after the posting date till today). 
--

विम्याचा महिमा

विमा ही आम्हा भारतीयांसाठी फार जुनी अगदी कौटील्याचा अर्थशास्त्रापासून चालत आलेली संकल्पना आहे. भारतात सर्वात पहिल्या विमा कंपनीची स्थापना 1818 मध्ये कलकत्त्याला झाली. भारताची अर्थव्यवस्था 1992 मध्ये मुक्त झाली व तेव्हापासून आजपर्यंत हे क्षेत्र 200 टक्क्याने वाढत आज 2000 अब्ज रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. पण तरीही ह्या क्षेत्राबद्दल व त्यातील व्यवहारांबद्दल सामान्यांचे ज्ञान हे त्यांच्या इन्शुुरन्स एजंटच्या पलीकडे नाही. आजच्या लेखातून आपण काही संकेतस्थळे पाहूया ज्यांच्या मदतीने आपण आपले विमा क्षेत्राचे ज्ञान वाढवून, विमा उतरवताना आपल्या निदान आवश्यक तेवढी माहिती तरी असेल ह्याची खात्री करू या. या साईटची मदत तर आपल्याला नक्कीच होईल पण ह्या साईट विशिष्ट मर्यादेपर्यंत वापरासाठी मोफत आहे. www.policybazaar.comwww.apnapaisa.com ह्या त्या साईटस्.



या साईटच्या मदतीने आपण विविध कंपन्यांच्या आयुर्विमेत्तर विमा (General Insurance), जीवन विमा (Life Insurance), क्रेडिट कार्डस् व कर्जाच्या (Loans) योजनांबद्दल जाणून व समजून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण पॉलिसीबझारवर आपल्याला विमा उतरवण्यासाठी लागणारी माहिती साईटवर टाकतो त्यावेळेस आपल्याला विविध विमा कंपन्याच्या विमा योजनांचा तुलनात्मक तक्ताच समोर उघडतो. पॉलिसीबझारवर जनरल इंशुरंन्स्‌ मधील गाडी, स्वास्थ्य, ट्रॅव्हल, घर व कॉर्पोरेट विमा, जीवन विम्यातील गुंतवणूक पॉलिसी, पेंशन, टर्म, बाल, मनीबॅक, मासिक वेतन, गॅरंटीड प्लॅन, इत्यादि विम्यांची माहिती आपल्याला मिळते. त्याशिवाय क्रेडिट कार्डस् व कर्जाच्या योजनांचा तुलनात्मक तक्तादेखील आपल्याला ह्या साईटवर मिळतो. यात कमीत-कमीत 20 कंपन्यांच्या विविध योजनांची माहिती दिलेली असते.

ऑनलाईन पॉलिसी
त्याशिवाय आपल्याला या साईटवरून गाडी, स्वास्थ्य, जीवन, ट्रॅव्हल व कॉर्पोरेट विमा उतरवण्यासाठी ऑनलाईन सोयदेखील उपलब्ध आहे. ज्यावेळेस आपण ह्या साईटकडून विमा विकत घेतो त्यावेळेस आपल्याला विमाशुल्क (Premium) भरण्यासाठी चेक, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगची सुविधादेखील वापरता येते. विमा उतरवताना आपल्याला वर उल्लेखिलेल्या तक्त्याची मदत तर घेता येतेच पण त्याशिवाय 0124 - 457 6777 ह्या 24 तास चालणार्‍या हेल्पलाईन नंबरवर फोन करून आपल्याला ह्या साईटच्या प्रतिनिधींचा सल्ला देखील मिळू शकतो. या साईटने आपल्या सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षेची चांगली काळजी घेतली आहे. त्यासाठी ही साईट एस.एस.एल. सिक्युर सर्टिफिकेटचा (SSL encryption) उपयोग करते. साईट ही माणसाला पर्याय ठरू शकत नाही पण ह्या साईटचे काही फायदे आपण नक्कीच घेऊ शकतो. 

पॉलिसी घेतल्यानंतर ह्या साईटचा उपयोग
पॉलिसी घेताना आपल्याला ह्या साईटवर आपले खाते उघडावे लागते. ह्या खात्यामुळे आपण आपल्या सर्व ऑनलाईन केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवू शकतो. त्याशिवाय आपण उतरवलेली पॉलिसीची प्रत प्रिंट करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या पॉलिसीमध्ये बदलदेखील करू शकतो. त्याशिवाय पॉलिसी रद्द व नूतनीकरणदेखील आपल्याला ह्या साईटवरून करता येते. जर आपण आपली पॉलिसी रद्द केली तर ह्या साईटचे प्रतिनिधी आपल्याला आपला परतावा विमा कंपनीकडून मिळवून देण्यास मदतही करतात असे कंपनीचे म्हणणे आहे.

त्याशिवाय जर आपल्या पॉलिसीचा दावा (Claim) विमा कंपनीकडे करायचा असेल तर त्यासाठी या साईटवर सर्व टी.पी.ए. (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनीस्ट्रेटरस् म्हणजेच क्लेमच्या वैधतेवर निर्णय देणार्‍या कंपन्या) किंवा स्वत: विमा कंपन्यातील क्लेम विभागांची संपूर्ण संपर्क माहिती उपलब्ध आहे.

ह्या जगात कुठलीही गोष्ट मोफत मिळत नाही. मग आपल्याला नक्कीच एक प्रश्‍न पडला असेल की जर ही साईट 20 विमा कंपन्यांचे विश्‍लेषण मोफत करते तर ह्यात या साईटचा फायदा काय? त्याचे उत्तर म्हणजे, ज्यावेळेस आपण या साईटचा उपयोग करून विमा, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतो त्यावेळेस ह्या विमा, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कडून या साईटला विपणन शुल्क (मार्केटींग फी) दिली जाते.

इतर सुविधा
विम्याच्या व्यतिरिक्त या साईटवर आपल्याला मोबाईल फोन व डी.टी.एच. सेवांच्या विविध कंपन्यांच्या योजनांचा तुलनात्मक तक्तादेखील मिळतो. www.apnapaisa.com ही साईटदेखील बरीचशी पॉलिसीबझार सारखीच आहे, पण त्यावर फक्त विविध विमा, कर्ज, गुंतवणूक व मोबाईल फोनच्या सेवांच्या योजनांचे तुलनात्मक तक्ते उपलब्ध आहेत. पॉलिसीबझार सारखे ऑनलाईन व्यवहार ह्या साईटवरून करता येत नाहीत.  

असे म्हणतात की माणसाला अनेक गोष्टीतील जुजबी व काही गोष्टीतील संपूर्ण ज्ञान असावे. विमादेखील असा विषय आहे. जरी आपला विमा एजंट आपल्या किती ही ओळखीचा व जुना असला तरी त्यावर पूर्ण विसंबून राहून आंधळा विश्‍वास टाकणे योग्य नाही. त्यासाठीच आपल्याला ह्या विषयातील अत्यावश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणूनच www.policybazaar.comwww.apnapaisa.com ह्या साईटस् आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment