latest Post

ईगो सर्चिंग - Ego Searching OR Vanity Searching

This article which I am publishing today had appeared in Dainik Pratyaksha on 25th March 2011. The article is on Ego Searching or Vanity Searching. I hope you all understand, use and enjoy this technique to help yourself and your organization to the fullest. 



ईगो सर्चिंग

इंटरनेट व त्यावरील सोशल मीडियामुळे प्रचंड प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण होत आहे. कोट्यवधी लोक हल्ली ब्लॉगिंग करतात, फेसबुक व ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटस्चा उपयोग करून अधिकाधिक लोकांशी संवाद साधतात. अनेक गोष्टींबद्दल येथे चर्चाही चालतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हल्ली सोशल नेटवर्किंग म्हणजे आधुनिक जमान्यातील ‘व्हर्चुअल चाळ’ बनली आहे. ज्यात सर्वांचे दरवाजे सतत उघडे असतात व कट्ट्यावरच्या गप्पा कायमच रंगलेल्या असतात. ह्या इंटरनेटवरील  गप्पा राजकारण, व्यापार, खेळ, सिनेमा, अशा विविध विषयांवर तर असतातच शिवाय अनेक वेळा ह्या गप्पांमध्ये व्यक्ती, संस्था, एखाद्या कंपनीची सेवा व उत्पादने ह्यावर ही चालतात. त्यामुळे जर आपण ब्रॅडिंगच्या व व्यावसायिक माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने विचार केला तर ह्या इंटरनेटवरील गप्पांबद्दल जाणून घेणे हे एखाद्या कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखासाठी, किंवा एखाद्या अभिनेत्याला त्याची समाजातील प्रतिमा जाणण्यासाठी, एखाद्या विषयातील ज्ञान मिळवू पाहणार्‍यांना किंवा अगदी देशाच्या गुप्तचर यंत्रणेला ही गरजेचे आहे. ह्या गप्पांमधून समाजमनाची नाडी कळते व म्हणूनच ते आवश्यक असते. ह्या जाणून घेण्यालाच ईगो सर्चिंग किंवा व्हॅनिटी सर्चिग असे म्हणतात. आजच्या आपल्या या भागातील विषय हाच आहे. या प्रकाराला ईगो सर्चिंग असे नाव शॉन कार्टन यांनी १९९५ साली दिले.

ईगो सर्चिंगमध्ये आपण कोणताही एक शब्द किंवा अनेक शब्द निवडून तो शब्द इंटरनेटवर किती वेळा लिहिला जातो ते आपल्याला कळते. जेव्हा-जेव्हा हा शब्द इंटरनेटवर उल्लेखिला जातो त्या वेळेस ज्या साईटचा उपयोग आपण ईगो सर्चिंगसाठी करत आहोत त्या साईटकडून आपल्याला ईमेलद्वारे तसे कळवले जाते. उदाहरणासाठी आपण www.socialmention.com ही साईट बघूया. या साईटवर आपण गेलो की आपल्याला आपला ईमेल आय.डी. या साईटला द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला तो शब्द निवडावा लागतो ज्याचा उल्लेख इंटरनेटवर कुठेही झाला की आपल्याला सूचना हवी असते. त्यानंतर ह्या शब्दाचा कोणत्याही ब्लॉगवर, फेसबुक व ट्विटरवरील पोस्टिंगस्मध्ये जेव्हा-जेव्हा उल्लेख होतो, त्यावेळेस आपल्याला या साईटद्वारे तो शब्द जेथे उल्लेखिला गेला आहे ती हायपरलिंक ईमेल केली जाते. www.socialmention.com सारखेच गुगल ऍलर्टस् www.google.com/alerts व याहू ऍलर्टस् http://alerts.yahoo.com ही असेच काम करते. गुगल ऍलर्टस्च्या वापराने आपण बातम्या, ब्लॉग्ज व वेब पेजस्वर उल्लेखिलेल्या व आपल्याला रस असणार्‍या कोणत्याही शब्दाबद्दल ही ईमेल पाठविली जाते. साधारणपणे www.socialmention.com ही साईट ब्लॉग्जमधील शोधासाठी अत्यंत उपयोगाची आहे. पण फेसबुक व ट्विटरशी निगडित सूचना हेरण्यासाठी www.kurrently.com ही साईट फार उपयोगी असल्याचे जाणवते. त्याशिवाय याच साईटचा उपयोग करून आपण गुगल, बिंग, बयदू व यूट्युब या सर्च इंजिन्स्‌वर ही आपल्याला हव्या असणार्‍या शब्दांबद्दल शोध घेऊ शकतो. तसेच www.findarticles.com  हे अशीच एक ईगो सर्चिंगची साईट आहे. ह्या साईट चा उपयोग खास करून विविध ऑनलाईन प्रकाशनातील उल्लेख शोधण्यासाठी होतो. ह्या साईटस्‌च्या व्यतिरिक्त www.whostalkin.com, http://search.twitter.com व अशा अनेक साईटस्चा उपयोग करून आपण ईगो सर्चिंग करू शकतो.

बुलेटीन बोर्डस्‌‍वरील ईगो सर्च
आपल्या सर्वांना बुलेटीनबोर्ड म्हणजे काय ते माहीतच असेल. बुलेटीनबोर्ड म्हणजे अशी साईट ज्यावर आपल्याला कोणत्याही विषयावर लिहिता येते. उदाहरण द्यायचे झाले तर www.misalpav.com, www.marathimati.com, www.maayboli.com, आणि http://mr.upakram.org हे मराठी भाषेतील बुलेटीनबोर्ड साईटस् आहेत. ह्या बुलेटीनबोर्डस्वरचे उल्लेख जाणण्यासाठी www.boardtracker.com ह्या साईटचा आपण चांगला उपयोग करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त www.boardreader.com, www.forumfind.com, इत्यादि साईटस्‌चा बुलेटीनबोर्डवरील ईगो सर्चमध्ये उपयोग होतो.

कशाचे ईगो सर्चिग करावे
आता आपण थोडक्यात बघूया की कोणत्याही संस्थेने या साईटस्च्याद्वारे काय जाणून घ्यायचे असते म्हणजेच कशाचे ईगो सर्च करायचे असते.
१) शक्यतो आपल्या कंपनीची उत्पादने / सेवांची नावे, आपल्या प्रमुख कर्मचार्‍यांची नावे ह्यांचा ईगो सर्च करावा. ह्यामुळे आपली कंपनी व त्याची  उत्पादन / सेवा आणि कर्मचार्‍यांबद्दल इंटरनेटवर काय बोलले जात आहे ते कळण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त हे कर्मचारी इंटरनेटवर काय बोलत आहेत तेही समजू शकते. 
२) त्याशिवाय आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी व त्यांची उत्पादने / सेवा व त्याच्या प्रमुख कर्मचार्‍यांची माहिती मिळवणे सुद्धा ईगो सर्चिगमधील महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्यामुळे आपल्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याची बलस्थानं व कच्च्या दुव्यांचा अंदाज बांधता येतो.
३) आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी व व्यक्तिमत्त्व यांच्यावर ही आपण ईगो सर्चिंग करावे ज्यामुळे आपल्याला आपल्या क्षेत्रातील घडामोडी कळण्यास मदत होते.

आर.एस.एस. फीडस्
ईगो सर्चिंगसाठी आपल्याला अजून एका साधनाचा वापर करता येतो. ते म्हणजे आर.एस.एस. फीडस्. आर.एस.एस. फीडस् म्हणजेच रीअली सिंपल सिंडिकेशन. या आर.एस.एस. फीडस् म्हणजेच ब्लॉग्स, वेबसाईटस्, बुलेटीनबोर्ड, इत्यादि अनेक इंटरनेटवरील स्त्रोतांच्या वेबपेजस्वर जेव्हा-जेव्हा माहिती अपडेट केली जाते तेव्हा आपल्याला नियमितपणे पाठविल्या जाणार्‍या सूचना व संकेत. ह्यातील पाठविल्या जाणार्‍या सूचना संक्षिप्त रूपात असतात. एक विशिष्ट विषयापुरत्याच सूचनासुद्धा आपल्याला मिळवता येतात. ह्या सूचना आपल्याला आपल्या वेब ब्राऊझर (उदा: मोझिला फायरफॉक्स) किंवा कोणत्याही आर.एस.एस. रीडरमध्ये पाठविल्या जातात. www.netnewswireapp.com, www.feedroll.com, www.google.com/reader, www.netvibes.com, इत्यादी साईटस्वरून आपल्याला ही आर.एस.एस. रीडर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरस् मोफत डाऊनलोड करता येतात. त्याशिवाय ह्या आर.एस.एस. रीडरमध्ये आपण अनेक स्त्रोतांच्या आर.एस.एस. फीडस् एकत्र वाचू शकतो. ह्या आर.एस.एस. फीडस्च्या उपयोगाने आपण विशिष्ट शब्दांचा उपयोग करुन नोकर्‍या, व्यापारातील भावी सहयोगी, इत्यादि शोधण्यासाठी उपयोग करू शकतो.

ह्याशिवाय जर आपल्याला कोणत्या वेब पेजवरच्या बदलांची सूचना हवी असेल तर www.changedetect.com या साईटचा आपण उपयोग करू शकतो. त्याशिवाय www.timelyweb.com या साईटवरुन आपल्याला टाईंमलीवेब नावाचेच एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मोफत डाऊनलोड करायला मिळते. हे ऍप्लिकेशनही चेंजडीटेक्ट.कॉम सारखेच काम करते. कोणत्या वेब पेजवरच्या बदलांची सूचना ही आर.एस.एस. फीडस् सारख्याच वेब ब्राऊझरमध्ये मिळतात.

इंटरनेट हे ग्राहक अधिकार (कंझ्युमर राईटस्) व लोकशाहीला पुरक ठरणारे फार मोठे साधन आहे. कारण इंटरनेटसारखे मुक्त व अफाट पसरलेले माध्यम ह्या जगात नाही. म्हणूच इंटरनेटला नोबेल शांती पुरस्काराच्या नामांकनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीररित्या विचार चालू होता. इंटरनेट ह्या माध्यमातून आज अनेक देश, कंपन्या व अगदी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आपली ओळख टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. दररोज आपल्याला आपल्या बरोबरील व्यक्तीच्या स्वभावाच्या व त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या नव-नवीन ओळखी होत जातात. म्हणजेच ओळख ही निरंतर बदलणारी गोष्ट आहे. जगसुद्धा आदीम काळापासून आजपर्यंत सतत बदलतच आले आहे. त्यामुळे ह्या बदलांचा वेध घेत पुढे जाणे म्हणजेच वास्तवाचे भान राखणे व या व्हर्चुअल जगातील ईगो सर्चिंगसुध्दा ह्या बदलत्या वास्तवाचा एक अविष्कार.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment